सुमारे 3 कोटी 46 लाखांचा अमली पदार्थ जप्त; 5 आरोपी अटकेत
खडकी / प्रतिनिधी : दि. २० डिसेंबर २०२५ पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ‘ऑपरेशन अलख निरंजन’ या विशेष मोहिमेअंतर्गत खडकी पोलीस स्टेशन हद्दीत नोंद असलेल्या एका गुन्ह्यात गांजा तयार व वितरित करणाऱ्या संघटित रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ कोटी ४६ लाख रुपये किमतीचा गांजा व इतर अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, खडकी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान या रॅकेटचे धागेदोरे उघडकीस आले. पुढील तपासात आरोपींनी पिंपरी-चिंचवड परिसरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये अत्याधुनिक पद्धतीने गांजा निर्मितीचे युनिट उभारल्याचे निष्पन्न झाले. या ठिकाणी गांजा लागवड, प्रक्रिया आणि वितरणासाठी आवश्यक साहित्य आढळून आले.
या प्रकरणात पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गांजा, इतर अमली पदार्थ, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सर्व आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटचे संपर्क पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई व गोवा अशा विविध ठिकाणांशी जोडलेले असल्याचा संशय आहे. या प्रकरणात आणखी आरोपी सहभागी आहेत का, तसेच आर्थिक व्यवहार व वितरण साखळी कशी कार्यरत होती, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल न्यायालयीन आदेशानुसार सुरक्षित ठेवण्यात आला असून, या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहाराला मोठा आघात बसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पुढील कारवाई तपासाअंती करण्यात येणार आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














