हरीश शर्मा – मुख्य संपादक। दि. 9 नोव्हेंबर
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ (वाकडेवाडी – गोखलेनगर परिसर) मध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून, गल्लीबोळात राजकीय चर्चा रंगताना दिसत आहे. मतदारांच्या गप्पांतून उमेदवारांची नावं, कामगिरी आणि आगामी लढतींची समीकरणं ठरवली जात आहेत.
या प्रभागात पारंपरिक राजकीय बालेकिल्ले असले तरी यंदा परिस्थिती काहीशी वेगळी दिसते. जुन्या नगरसेवकांसोबत नव्या चेहऱ्यांचीही चर्चा सुरू आहे. काही अनुभवी उमेदवार पुन्हा संधी शोधत आहेत, तर शिक्षित, तरुण आणि समाजकार्याचा अनुभव असलेले नवे चेहरे जनतेसमोर आपला अजेंडा मांडण्यासाठी सक्रिय झाले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना त्रासदायक ठरत असलेले मुद्दे — झोपडपट्टयांमधील एसआरए मुद्दा, अनीयमित पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, आणि कचरा व्यवस्थापन — या निवडणुकीत प्रमुख चर्चेचे विषय ठरले आहेत. मतदारांकडून “बोलणारा नव्हे, काम करणारा उमेदवार हवा” अशी भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या रणनीतींवर काम सुरू केले आहे. प्रचार समित्या तयार होत आहेत, कार्यकर्त्यांची बैठकांची मालिकाही सुरु झाली आहे. सोशल मीडियावरही प्रचार मोहिमेची धूम आहे. काही उमेदवारांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामद्वारे थेट संवाद साधण्याचा मार्ग अवलंबला आहे. विशेष करून आमदारकी लढविलेले उमेदवार ही रिंगणात आहेत.
स्वतंत्र उमेदवारांचं अस्तित्वही या वेळी जाणवण्याजोगं आहे. स्थानिक मुद्द्यांवर आवाज उठवणारे, लोकांशी थेट संपर्क असलेले काही कार्यकर्ते स्वतंत्र लढतीची तयारी करत आहेत. त्यामुळे त्रिकोणी लढतीचे चित्रही काही ठिकाणी दिसत आहे.
प्रभाग ७ मध्ये तरुण मतदारांचा मोठा हिस्सा आहे, आणि त्यांचा कल या वेळी निर्णायक ठरू शकतो. युवा पिढी विकास, रोजगार आणि स्थानिक सुविधा या मुद्यांवर अधिक जागरूक झाली आहे.
एकूणच, वाकडेवाडी–गोखलेनगर पाटील इस्टेट परिसरात निवडणुकीच्या दिशेने वातावरण रंगले आहे. प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार मतदारांच्या मनात जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. येत्या काही दिवसांत प्रचाराची गती आणखी वाढेल आणि कोणते चेहरे या प्रभागात पुढे येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















