मागील समिती अडीच वर्षांत बरखास्त झाल्यानंतर नव्या नेतृत्वाची निवड; तीन पॅनल आणि एक अपक्ष उमेदवार रिंगणात
हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 10 जून 2026 हिंजवडी हिल्स फेज-2 सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायटीतील विविध मूलभूत प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. शनिवार, दि. 13 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत होणाऱ्या मतदानासाठी तीन पॅनल आणि एक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले असून रहिवाशांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.
संस्थेच्या 19 सदस्यीय व्यवस्थापन समितीसाठी ही निवडणूक होत असून निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. संस्थेच्या मतदारांची संख्या मोठी असली तरी अनेक सदनिकाधारक बाहेरगावी वास्तव्यास असल्याने प्रत्यक्ष मतदानात स्थानिक रहिवाशांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
सोसायटीतील रहिवाशांशी संवाद साधताना पाणीगळती, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, अंतर्गत रस्त्यांची अवस्था, कचरा व्यवस्थापन, मेंटेनन्स आणि प्रशासनातील पारदर्शकता हे प्रमुख मुद्दे पुढे येत आहेत. अनेक रहिवाशांनी सोसायटीच्या दैनंदिन व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्नांवर समाधानकारक तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
या निवडणुकीत ‘चेंज मेकर्स पॅनल’ (चिन्ह – माईक), ‘हिंजवडी हिल्स फर्स्ट पॅनल’ (चिन्ह – ओपन बुक), ‘युनिटी पॅनल’ (चिन्ह – साखळी) तसेच एक अपक्ष उमेदवार (चिन्ह – कपाट) मतदारांचा कौल मागत आहेत.
निवडणूक प्रचारादरम्यान विविध पॅनलकडून आपापल्या भूमिका मांडल्या जात आहेत. ‘चेंज मेकर्स पॅनल’ने सोसायटीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यावर भर देत महत्त्वाचे निर्णय बंद दाराआड न घेता रहिवाशांना विश्वासात घेऊन प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन दिले आहे.
‘हिंजवडी हिल्स फर्स्ट पॅनल’ ने कचरा व्यवस्थापन, मेंटेनन्स खर्चाचे नियोजन आणि स्वच्छ पाणीपुरवठा यांसारख्या विषयांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे.
तर अपक्ष उमेदवाराने सोसायटीचा कारभार लोकशाही पद्धतीने चालविण्यावर भर देत रहिवाशांसाठी सातत्याने उपलब्ध राहण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, सोसायटीची मागील व्यवस्थापन समिती आपला पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच अडीच वर्षांत बरखास्त झाल्याने यावेळची निवडणूक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. नव्याने निवडून येणाऱ्या समितीकडून प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा अनेक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
निवडणुकीत कोणत्या पॅनलला किंवा उमेदवाराला रहिवाशांचा कौल मिळणार याचा निर्णय 13 जून रोजी होणार असून सोसायटीच्या भावी प्रशासनाची दिशा ठरविणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏



















