महामंडळ आणि सदस्यांच्या हितासाठी आठ अपक्ष उमेदवार एकत्र; प्रस्थापितांच्या कारभारावर जोरदार टीका
पुणे | प्रतिनिधी : दी. 4 जून 2026
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापित गटांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, निवडणुकीत समोरासमोर दिसणारी दोन्ही प्रमुख पॅनल प्रत्यक्षात एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून महामंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या संचालकांनी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि सभासदांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ अंतर्गत राजकारण आणि गटबाजी करण्यात वेळ घालवल्याचा आरोपही त्यांनी केला.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना लोणकर यांनी सांगितले की, महामंडळातील प्रस्थापितांची मुजोरी मोडून काढण्यासाठी आणि सभासदांच्या हितासाठी आठ अपक्ष उमेदवारांनी एकत्र येत स्वतंत्र संघ उभा केला आहे. या पत्रकार परिषदेला दिग्दर्शक अमोल भावे, निर्माता महादेव शिरोळकर, मानसिंग कदम, कला दिग्दर्शक उल्हास नांद्रे यांच्यासह अभिनेत्री व निर्मात्या भाग्यश्री देसाई उपस्थित होत्या. अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि शाहीर संभाजी भगत यांच्यासह अनेक मान्यवरांचा पाठिंबा असल्याचा दावाही अपक्ष संघाने केला.
लोणकर यांनी आरोप केला की, दोन्ही प्रमुख पॅनलमधील अनेक माजी संचालक वेगवेगळ्या गटांतून निवडणूक लढवत असले तरी त्यांच्यातील समन्वय स्पष्टपणे दिसून येतो. काही उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी दोन्ही गटांनी परस्पर सहकार्य केल्याचा आरोप करत त्यांनी संपूर्ण प्रक्रियेला “मिलीभगत” असे संबोधले.
महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नसल्याचा दावा फेटाळून लावताना लोणकर म्हणाले की, काही उमेदवार आणि राजकीय नेत्यांमधील संबंध सर्वश्रुत असून निवडणूक प्रक्रियेवर राजकीय प्रभाव अद्याप कायम आहे. वितरण आणि प्रसिद्धी विभागातून निवडणूक लढवत असलेल्या लोणकर यांनी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धी आणि वितरण व्यवसायाच्या नावाखाली आर्थिक शोषण होत असल्याचाही आरोप केला.
दरम्यान, दिग्दर्शक अमोल भावे यांनी गेल्या दशकातील कारभारावर टीका करताना कलाकार, तंत्रज्ञ आणि सभासदांच्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचे सांगितले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी गरीब कलाकारांच्या निवासासाठी आणि वृद्धाश्रमासाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर अद्याप कोणतेही ठोस काम झाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
महादेव शिरोळकर यांनी महामंडळाच्या घटनेतील बदल, मालमत्ता निर्मिती आणि आर्थिक निर्णयांबाबत सभासदांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याचा आरोप केला. तसेच पुणे महापालिकेकडून कमी भाडेतत्त्वावर मिळू शकणारी जागा नाकारून स्वतंत्र कार्यालयांवर मोठा खर्च करण्यात आल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
‘महामंडळात गुंडा-कुंडांचा मुजोर कारभार’ – भाग्यश्री देसाई
अभिनेत्री व निर्मात्या भाग्यश्री देसाई यांनी मतदार यादीच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आरोप केला की, निवडणुकीत विशिष्ट उमेदवारांना फायदा व्हावा यासाठी अनेक पात्र सदस्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
“मी स्वतः अनेक वर्षे मतदार होते, मात्र यंदा माझे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले. मृत व्यक्तींची नावे मात्र यादीत कायम ठेवण्यात आली असून त्यांच्या नावावर बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे देसाई यांनी सांगितले.
सुमारे ४० हजार संभाव्य मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी चित्रपटसृष्टीशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट केल्याचाही दावा केला. “हा सर्व गुंडा-कुंडांचा मुजोर कारभार असून चांगली आणि प्रामाणिक माणसे महामंडळावर यावीत म्हणून मी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देत आहे,” असे त्या म्हणाल्या.
यावेळी अपक्ष संघाच्या उमेदवारांनी सभासदांना बदलासाठी मतदान करण्याचे आवाहन करत महामंडळात पारदर्शक, उत्तरदायी आणि सभासदकेंद्रित कारभाराची ग्वाही दिली.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏



















