बोपोडी | प्रतिनिधी : दि. 6 जून 2026 बोपोडी परिसरातील हजरत शम्सुद्दीन कादरी रहमतुल्लाह अलैह दर्गा पुणे महापालिकेने पाडण्यात आल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई तसेच राज्यातील विविध सामाजिक, धार्मिक आणि नागरिक संघटनांच्या प्रतिनिधींनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.
प्रतिनिधी मंडळाने या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. तसेच दर्ग्याबाबत पुढील निर्णय घेताना स्थानिक नागरिकांच्या भावना, ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक सलोखा यांचा विचार करण्यात यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, संबंधित दर्गा अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांसाठी श्रद्धास्थान म्हणून ओळखला जात होता. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटल्या असून प्रशासनाने संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता राखावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चे दरम्यान दर्गा पाडण्यामागील कारणे, प्रशासकीय प्रक्रिया आणि संबंधित निर्णयांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली. तसेच कायदेशीर चौकटीत राहून या विषयावर योग्य तो तोडगा काढण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रतिनिधी मंडळात अन्सारी साहेब व त्यांची टीम, जमात-ए-मुस्लिमीनचे मुनाफ शेख, स्वीकृत माजी नगरसेवक करीम शेख, दर्गाह समितीचे आरिफ पीरजादे व नियाज पीरजादे, मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर शेख, मूल निवासी संघटनेचे अध्यक्ष अंजुम इनामदार, सादिक शेख, सामाजिक कार्यकर्ते अकबर शेख, रफिक तुर्क, गफ्फार तुर्क तसेच बोपोडी व परिसरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी शांतता, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मार्गाने न्याय मिळविण्याची भूमिका व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली असून संबंधित मागण्यांबाबत प्रशासनाकडून पुढील कार्यवाही अपेक्षित असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.
(संपादकीय टीप : सदर वृत्त निवेदनातील माहितीवर आधारित असून संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏



















