पुणे / प्रतिनिधी : दि. १४ डिसेंबर २०२५ :
ऊर्जा संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि आदर्शवत कार्य केल्याबद्दल ब्रह्माकुमारी सुनंदा दीदी, संचालिका, ब्रह्माकुमारीज जगदंबा भवन, पुणे यांना राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनानिमित्त भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपूर्ण भारतातून “ऊर्जा संरक्षणासाठी सर्वोत्तम निवासी युनिट” या प्रतिष्ठित श्रेणीत पुण्यातील जगदंबा भवनची निवड करण्यात आली आहे.
ऊर्जा संरक्षण क्षेत्रात पुण्याच्या जगदंबा भवनचा राष्ट्रीय सन्मान ऊर्जा कार्यक्षमतेसाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण तांत्रिक उपाययोजना, ऊर्जेचा किफायतशीर व विवेकपूर्ण वापर, नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा प्रभावी अवलंब, तसेच पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे उपक्रम यामुळे जगदंबा भवनची राष्ट्रीय स्तरावर विशेष दखल घेण्यात आली. ऊर्जेचा अपव्यय टाळण्यासाठी आखलेली नियोजनबद्ध यंत्रणा आणि सर्व निवासी सदस्यांचा सक्रिय सहभाग हे या यशाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
जगदंबा भवन परिसरात वीज बचतीसाठी सौरऊर्जा प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत असून ऊर्जा कार्यक्षम उपकरणांची अंमलबजावणी, नैसर्गिक प्रकाश व वायुवीजनाचा अधिकाधिक उपयोग तसेच ऊर्जा संवर्धनाबाबत नियमित जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत. या सर्व उपक्रमांमुळे ऊर्जा बचतीसह कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट साध्य करण्यात यश आले आहे.
या राष्ट्रपती पुरस्कारामुळे ब्रह्माकुमारीज संस्थेच्या ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि मूल्याधिष्ठित जीवनशैलीविषयीच्या दूरदृष्टीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजात ऊर्जा बचतीबाबत जनजागृती निर्माण करण्याचे कार्य सातत्याने सुरू असून अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून शाश्वत विकासाचा प्रभावी संदेश दिला जात आहे.
हा सन्मान केवळ एका संस्थेपुरता मर्यादित नसून देशभरातील निवासी संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांसाठी ऊर्जा बचत व पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी आदर्श ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















