न्याय्य मागण्यांसाठी चालक रस्त्यावर; शासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र असंतोष
पुणे | प्रतिनिधी : दि. 6 फेब्रुवारी 2026
देशभर सुरू असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवा तसेच ओला, उबर आणि रॅपिडो कंपन्यांच्या मनमानी भाडे धोरणाविरोधात दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यासह संपूर्ण देशात कॅब व रिक्षा चालकांचा एकदिवसीय बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये राज्यातील सर्व ओला, उबर, रॅपिडो कॅब तसेच रिक्षा चालक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनांच्या वतीने देण्यात आली.
गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्षा व कॅब चालक विविध आंदोलनांच्या माध्यमातून आपल्या समस्या आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने ओला, उबर व रॅपिडो कंपन्यांना सरकारमान्य नियम व आदेशांचे पालन करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या आहेत. मात्र, या आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या कंपन्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, बेकायदा बाईक टॅक्सी सेवांमुळे मुंबईत काही नागरिकांचे दुर्दैवी मृत्यू झाले असून अनेक प्रवासी कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे गेले आहेत. या सेवा बेकायदा असल्याने अपघातग्रस्त प्रवाशांना विमा संरक्षण मिळत नाही, ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
तसेच, पॅनिक बटनच्या नावाखाली कॅब चालकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. केंद्र सरकारमान्य पॅनिक बटन उपकरण पुरवणाऱ्या 140 कंपन्या अस्तित्वात असताना, राज्य शासनाने त्यातील सुमारे 70 टक्के कंपन्यांना अनधिकृत ठरवले आहे. परिणामी चालकांना आधी बसवलेली उपकरणे काढून टाकून सुमारे 12 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च करून नवीन उपकरणे बसवावी लागत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, शासनाने स्वीकारलेल्या खुल्या रिक्षा परवाना धोरणामुळे गरजेपेक्षा जास्त रिक्षा रस्त्यावर उतरल्याने चालकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. उत्पन्न विभागले गेल्याने रिक्षाचालक आर्थिक संकटात सापडले असून, यामुळे शहरांमध्ये वाहतूक कोंडी आणि वाहतूक समस्या अधिक तीव्र झाल्या आहेत.
वरील सर्व गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि कॅब-रिक्षा चालकांच्या न्याय्य हक्क व मागण्यांसाठी हा देशव्यापी एकदिवसीय बंद आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सभा व भारतीय गिग कामगार मंचाचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी दिली आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















