माहिती अधिकारातून उघड झाली बाब; सचिन कौदरे यांची चौकशीची मागणी, पदभरती व प्रशासकीय प्रक्रियेवर नागरिकांमध्ये चर्चा
खडकी | प्रतिनिधी : दि. 22 मे 2026 खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील एका कर्मचाऱ्याच्या कामकाजाबाबत माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनंतर प्रशासकीय पातळीवर नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. श्री बाप्पू भालेराव हे सुरुवातीला सफाई कर्मचारी म्हणून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात रुजू झाले होते. त्यानंतर त्यांची बढती होऊन त्यांची नियुक्ती वाहन चालक (ड्रायव्हर) पदावर करण्यात आली होती.
मात्र, गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून ते आरोग्य अधीक्षकांच्या कार्यालयात पर्सनल असिस्टंट (पीए) स्वरूपाचे काम पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना संबंधित कार्यालयीन जबाबदारी दिल्याचे सांगितले जात आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सचिन कौदरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे माहिती मागवली होती. त्यामध्ये श्री बाप्पु भालेराव यांची मूळ नियुक्ती, पदोन्नती, सध्याचे कामकाज, शैक्षणिक पात्रता तसेच त्यांना संबंधित विभागात काम देण्याबाबतचे आदेश याविषयी माहिती विचारण्यात आली होती.
माहिती अधिकारातून मिळालेल्या उत्तरानुसार, श्री बाप्पु भालेराव यांनी १ मार्च २००४ ते १४ मे २०१७ या कालावधीत सफाई कर्मचारी म्हणून काम केले असून, १५ मे २०१७ पासून ते वाहन चालक पदावर कार्यरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांची शैक्षणिक पात्रता बी.कॉम असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
दरम्यान, वाहन चालक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याकडून पर्सनल असिस्टंट स्वरूपाचे काम घेतले जात असल्याने प्रशासकीय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित पद रिक्त असताना दुसऱ्या पदावरील कर्मचाऱ्याकडून दीर्घकाळ ते काम करून घेणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे संबंधित पदासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये सुरू आहे.
याबाबत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र माहिती अधिकारातून समोर आलेल्या या प्रकरणामुळे बोर्डातील कामकाज व पदनियुक्ती प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















