पुणे | प्रतिनिधी : दि. 10 जुलै 2026 आषाढी वारीचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि बालगंधर्व परिवार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली “भव्य कलाकार दिंडी” शुक्रवारी पुण्यात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.
“संतांच्या चरणी… कलेच्या संगतीने!” या संकल्पनेवर आधारित दिंडीत चित्रपट, नाटक, संगीत, नृत्य तसेच विविध कला क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विठ्ठल नामाचा अखंड गजर, अभंग, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि भगव्या पताकांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त वारी, जलसंधारण, सामाजिक ऐक्य आणि सामाजिक बांधिलकी यांसारखे महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आले. कलाकारांनी आपल्या सहभागातून समाजप्रबोधनाचा संदेश देत अध्यात्मासोबत सामाजिक जबाबदारीची जाणीवही नागरिकांपर्यंत पोहोचवली.

यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, बालरंगभूमीच्या अध्यक्षा नीलम शिर्के-सामंत, कायदेशीर सल्लागार ॲड. मंदार जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री रजनी भट, जयमाला इनामदार, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, तृप्ती देसाई, गायक डॉ. उत्कर्ष शिंदे, राज काझी, वासू पाटील, अजित शिरोळे, अनिल नगरकर, राधा कुलकर्णी, आर्या घाटे यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी, सदस्य, बालगंधर्व परिवार ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने कलाकार सहभागी झाले.
दिंडीचा शुभारंभ बालगंधर्व रंगमंदिर येथून झाला. त्यानंतर पुणे महानगरपालिका भवन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शन घेऊन दिंडी पालखी चौक, नाना पेठ येथे भक्तिमय वातावरणात पोहोचली.
या उपक्रमाचे संकल्पनाकार मेघराज राजेभोसले यांनी उपस्थित कलाकार, वारकरी, पदाधिकारी आणि नागरिकांचे आभार मानत, कला, संस्कृती आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवून आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले. समाजप्रबोधन, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक मूल्यांचा प्रसार हेही या दिंडीमागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही अशा सांस्कृतिक, सामाजिक आणि भक्तिमय उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या भव्य कलाकार दिंडीमुळे पुणे शहरात भक्ती, संस्कृती आणि कलेचा अनोखा मिलाफ अनुभवायला मिळाला. कलाकार आणि वारकरी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आषाढी वारीचा आध्यात्मिक उत्साह अधिकच द्विगुणित झाला.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















