“लहानपणाचा साथी, आयुष्यभराची आठवण — रुपेश तुझी उणीव आजही जाणवते!”
लेखक : हरीश शर्मा, संपादक — पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
आज 8 नोव्हेंबर…
माझ्या आयुष्यातील एक अत्यंत भावनिक दिवस. आज माझा लहानपणापासूनचा जिवलग मित्र रुपेश बाळासाहेब शिंदे याच्या निधनाला पूर्ण एक वर्ष झालं आहे. पण खरं सांगायचं तर, रुपेश गेल्यानंतरही तो माझ्या प्रत्येक आठवणीत, प्रत्येक श्वासात आहे.
१९८६ च्या सुमारास आम्ही दोघे पुणे महापालिकेच्या शाळेत पाचवी-सहावीला शिकत होतो. आमची घरची परिस्थिती साधीच होती, पण मन मात्र स्वप्नांनी भरलेलं. रुपेशच्या घरात शिस्त, नियम यांना मोठं स्थान होतं — कारण त्याचे वडील सैन्यात होते. त्या घरातून त्याने घेतलेली शिस्त आणि प्रामाणिकपणा ही त्याची खरी ओळख होती.
शाळा सुटल्यावर आम्ही सायकलवर संपूर्ण पुणे पालथं घालायचो. मित्र म्हणून आम्ही इतके जवळ होतो की, त्याच्याविना मला आणि माझ्याविना त्याला काहीच करमत नसे. त्याच्या घरी गेलो की त्याची आई मला जेवण देऊनच पाठवायची. माझ्या आईलाही ठाऊक — “रुपेशच्या घरी गेला म्हणजे काळजी नाही.”
नववीपर्यंत आम्ही एकत्र शाळेत गेलो, पण त्यानंतर रुपेशच्या आयुष्यात जबाबदाऱ्या आल्या. वडिलांच्या निधनानंतर त्याने घराची सर्व जबाबदारी खांद्यावर घेतली. कष्ट, प्रामाणिकपणा आणि कुटुंबासाठी जगण्याची तळमळ — हाच त्याचा धर्म होता.
मी पत्रकारितेत आलो, पुण्यनगरी, पुढारी ,प्रभात, लोकमत,सकाळ मध्ये पत्रकार म्हणून काम केले त्यावेळी ही रुपेश माझ कौतुक करायचा आता “पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live” ची सुरुवात केली, आणि त्या प्रत्येक टप्प्यावर रुपेश माझ्या पाठीशी उभा राहिला. माझं यश त्याचं आनंद होतं; माझं दु:ख त्याचं ओझं बनायचं.
पण नियतीने आमचं हे सुंदर नातं तोडलं.
एक दिवस कामावरून जाताना हडपसरजवळ रेल्वेगेटजवळ त्याची दुचाकी घसरली…
तेव्हापासून आजारपणाशी त्याची लढाई सुरू झाली. अनेक डॉक्टर, अनेक उपचार — पण त्याच्या शरीराने साथ सोडली.
आणि अखेर 2024 मध्ये तो कायमचा निघून गेला…
आज त्याच्या वर्षश्रद्धेच्या दिवशी त्याच्या आठवणींचा प्रवाह डोळ्यांतून वाहतो आहे. रुपेश गेला, पण त्याची मैत्री, त्याचा हसरा चेहरा, त्याचा शिस्तबद्ध स्वभाव — हे सगळं अजून माझ्या सोबत आहे.
मित्रा, तू गेलास, पण तू हरवलास नाहीस… तू माझ्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक आठवणीत कायम जिवंत आहेस.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















