पुणे | दि. २४ जानेवारी २०२६
महाराष्ट्र राज्य हज समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नॉन-मुस्लिम आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने राज्यातील मुस्लिम समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या नियुक्तीबाबत मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन यांनी अधिकृतपणे आक्षेप नोंदवत सरकारच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
हज ही इस्लाम धर्मातील अत्यंत महत्त्वाची धार्मिक यात्रा असून, ती इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक मानली जाते. त्यामुळे हजशी संबंधित प्रशासकीय संस्थांमध्ये धार्मिक बाबींची जाण असलेली व्यक्ती असणे आवश्यक असल्याचे मत फाउंडेशनने व्यक्त केले आहे.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“हज यात्रेच्या व्यवस्थापनामध्ये धार्मिक परंपरा, नियम, शरियत व यात्रेकरूंच्या भावनांचा विशेष विचार करावा लागतो. त्यामुळे या पदावर संबंधित धर्माची पार्श्वभूमी आणि जाण असलेली व्यक्ती असणे योग्य ठरेल.”
सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख यांनी या नियुक्तीचा कायदेशीर अंगाने विचार करण्याची गरज असल्याचे नमूद केले. त्यांनी Central State Hajj Committee Act चा संदर्भ देत सांगितले की, या कायद्यानुसार केंद्र व राज्य हज समित्यांमधील सदस्य व पदाधिकारी हे प्रामुख्याने मुस्लिम समाजातील असावेत, जेणेकरून हज यात्रेचे धार्मिक व प्रशासकीय व्यवस्थापन सुसंगत राहील.
महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत सौदी अरेबियाकडून प्राप्त होणाऱ्या हज कोट्याची अंमलबजावणी केली जाते. दरवर्षी सुमारे १.७५ लाख भारतीय भाविक हज यात्रेसाठी जातात, त्यामुळे या समितीवर मोठी जबाबदारी असते. अशा परिस्थितीत नियुक्ती प्रक्रियेत धार्मिक संवेदनशीलतेचा विचार होणे आवश्यक असल्याचे मत फाउंडेशनने मांडले आहे.
अन्वर शेख यांनी स्पष्ट केले की,
“या नियुक्तीबाबत योग्य कायदेशीर मार्गाने सरकारकडे आक्षेप नोंदवण्यात येईल. मुस्लिम समाजाच्या घटनात्मक हक्कांशी संबंधित कोणत्याही विषयावर शांततामय आणि कायदेशीर लढा दिला जाईल.”
मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने सरकारला निवेदन देण्यात येणार असून, हजसारख्या धार्मिक विषयांमध्ये निर्णय घेताना संविधान, संबंधित कायदे आणि अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा आदर राखावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















