ओटा तोडल्याप्रकरणी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे धरणे आंदोलन
खडकी | प्रतिनिधी : दि. 19 मे 2026 खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील रेंजहिल्स येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मार्केटच्या सीमाभिंतीजवळ असलेला ओटा खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य निरीक्षक प्रसाद गावंडे यांनी विनापरवाना जेसीबीच्या साहाय्याने तोडून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप करत बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.


या आंदोलनामध्ये दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या. पहिली मागणी म्हणजे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात कार्यरत असलेले आरोग्य निरीक्षक प्रसाद गावंडे यांनी बेकायदेशीररित्या कॅन्टोन्मेंटच्या मालमत्तेची तोडफोड केल्याचा आरोप करत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच दुसरी मागणी रेंजहिल्स येथील अण्णाभाऊ साठे मार्केटमधील बेकायदेशीर ताब्यांविरोधात करण्यात आली आहे.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, रेंज हिल्स कॅन्टोन्मेंट मार्केटमध्ये 1980 पासून लिलाव प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे अनेकांनी बेकायदेशीर ताबा घेऊन दुकाने सुरू ठेवली असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनात उदय धेंडे, सुजित म्हस्के, देवेंद्र वेणुगोपाल, रिकी परदेशी, राजेश मोरे, अभिजित गडांकुश, राहुल अवचिते, निखिल दुर्गा, कार्तिक पाळकर, शुभम धेंगळे आणि ऋषी डोरके आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
“जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच राहणार,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देताना खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य निरीक्षक प्रसाद गावंडे म्हणाले, “रेंजहिल इस्टेट परिसरात सुविधा पुरवण्याचे काम खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामार्फत केले जाते. एएफकेकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर संबंधित ओटा हटविण्यात आला. त्या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले होते.”

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















