रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप
नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026
गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी न आल्याने संपूर्ण परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायतीकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ढमाले वस्तीपासून नेरे-दत्तवाडीपर्यंत तसेच एक्सर्बिया रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. अनेक ठिकाणी कचरा थेट रस्त्यावर पडून असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
“जर कचरा गाडीच येत नसेल, तर आम्ही कचरा टाकायचा कुठे?” असा संतप्त सवाल येथील महिलांनी उपस्थित केला आहे. अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नसतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
“ढमाले वस्तीपासून दत्तवाडीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हे ग्रामपंचायत प्रशासनाला दिसत नाही का? ग्रामसेवक नेमके काय करत आहेत?” असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
त्वरित उपाययोजनांची मागणी
दत्तवाडी परिसरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने तातडीने कचरा उचलण्याची व्यवस्था करावी किंवा पर्यायी उपाययोजना उपलब्ध करून द्यावी. तसेच गेल्या आठ दिवसांपासून कचरा गाडी का बंद आहे, याचा खुलासा प्रशासनाने नागरिकांसमोर करावा, अशी मागणी होत आहे.
“दत्तवाडी परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने त्वरित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी. नागरिकांना वेठीस धरू नये. तसेच आठ दिवसांपासून कचरा गाडी का बंद आहे, याचा खुलासा प्रशासनाने करावा.”
– संदीप जाधव पाटील , सामाजिक कार्यकर्ते, नेरे-दत्तवाडी

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏















