मराठी पत्रकार संघाचा इशारा – “पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही”; कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या बातम्यांवर राज्यव्यापी बहिष्कार
पिंपरी | प्रतिनिधी :दि. 27 जून 2026 पत्रकारांना धमकीची भाषा करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये उमटले असून, मराठी पत्रकार संघाने शुक्रवारी चिंचवड येथे जोरदार निदर्शने करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा देत संघटनेने संबंधित खासदारावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली.
के. एस. बी. चौक येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांनी फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. “पत्रकारांना धमक्या देणाऱ्यांना जनता उत्तर देईल”, “लोकशाहीचा चौथा स्तंभ झुकणार नाही”, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, पुणे जिल्हाध्यक्ष संजय मराठे, विकास साळवे आणि संगीता पाचंगे यांनी आपल्या भाषणातून खासदारांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. पत्रकारांना गप्प बसविण्याचा प्रयत्न म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे सांगत, प्रश्न विचारणे हे पत्रकारांचे कर्तव्य असून ते कोणत्याही दबावाखाली थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“प्रश्न विचारणे गुन्हा असेल, तर आम्ही गुन्हेगार!” या घोषवाक्याखाली पार पडलेल्या आंदोलनात पुणे व पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी विवेक कुलकर्णी, बजरंग मासाळ, संतोष महामुनी, रोहित खर्गे, नागेश खजुर्गीकर, पराग डिंगणकर, उमेश सणस, तौफीक सय्यद, गजाला सय्यद, आसीया इनामदार, उमेश पाटील, जगदीश बच्छाव यांच्यासह मराठी पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी, सदस्य आणि पत्रकार उपस्थित होते.
संघटनेने स्पष्ट इशारा दिला की, खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पक्षाने तातडीने कारवाई केली नाही, तर राज्यभर शिवसेना पक्षाच्या बातम्यांवर बहिष्कार टाकण्यासह व्यापक आंदोलन उभारण्यात येईल.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















