बोपोडी / प्रतिनिधी : दि. १४ डिसेंबर २०२५ पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या बोपोडी परिसरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. बोपोडी येथील वी. भा. पाटील पूल परिसरापासून मुंबई–पुणे महामार्गाकडे जाणाऱ्या हायरिस ब्रिजपर्यंत, बोपोडी मैला पाणी शुद्धीकरण केंद्राच्या भिंतीलगत असलेल्या पदपथावर मोठ्या प्रमाणात कचरा, राडारोडा व अस्वच्छता पसरलेली आहे.


स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी नियमित स्वच्छता न झाल्याने दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून काही व्यक्तींकडून उघड्यावर लघुशंका केली जात असल्याने परिसरातील आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. विशेष बाब म्हणजे, याच ठिकाणी पुणे महापालिकेच्या कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या देखील उभ्या असल्याचे चित्र दिसून येते.
काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या वतीने मैला शुद्धीकरण केंद्राच्या भिंतींवर स्वच्छतेबाबत जनजागृती करणारी भित्तीचित्रे (पेंटिंग) करण्यात आली होती. तसेच नागरिकांसाठी पदपथावर दगडी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या बाकड्यांच्या आजूबाजूला सध्या कचऱ्याचे ढिग साचल्याने या सुविधांचा उपयोग होण्याऐवजी परिसर अधिक अस्वच्छ झाल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

‘माझा गाव, माझा अभिमान’च्या पलीकडे घाणीचे साम्राज्य सध्या निवडणुकीचे वातावरण तापले असताना विविध पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त असले तरी या ठिकाणच्या स्वच्छतेकडे कोणाचेही लक्ष गेले नसल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. “आधी काम करा, मग निवडणूक लढवण्यासाठी सज्ज व्हा,” अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे या परिसराच्या जवळच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नेते वास्तव्यास असतानाही, प्रत्यक्ष स्वच्छतेसाठी ठोस पावले उचलली जात नसल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. ‘बोपोडी – माझा गाव, माझा अभिमान’ असा फलक चौकात लावण्यात आला असला तरी, त्याच परिसरात काही अंतरावर अस्वच्छतेचे चित्र दिसत असल्याने महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन परिसराची स्वच्छता, कचऱ्याची नियमित उचल व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची मागणी होत आहे. आता या गंभीर प्रश्नाकडे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















