जांबे–मारुंजी रस्ता ‘डेथ झोन’ की सुरक्षिततेचा बोजवारा?
हिंजवडी / प्रतिनिधी : दि. १८ नोव्हेंबर जांबे–मारुंजी रस्त्यावर अवजड वाहनाने दिलेल्या जबर धडकेत तरुणीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना १७ नोव्हेंबर सोमवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास घडली. तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय २०, रा. मुक्तानंद हाइट्स, गावठाण रस्ता, हिंजवडी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या दुर्दैवी अपघातात तिचे वडील सिद्धेश्वर लक्ष्मण साखरे (वय ४५) जखमी झाले आहेत.
ही घटना लाईफ रिपब्लिक सोसायटीसमोर सावंत पार्क चौकाजवळ घडली. तन्वी हिच्या निधनाने हिंजवडी, मारुंजी, जांबे परिसरासह आयटी पार्क भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तन्वी ही फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत होती. अपघाताच्या वेळी ती आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून (MH 14 KV 3883) मारुंजीकडे जात होती. दरम्यान, मागून येणाऱ्या डंपरने (MH 14 HU 9855) दिलेल्या धडकेत ती चाकाखाली येऊन जागीच मयत झाली. तिचे वडील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर डंपर चालक अजय अंकुश ढाकणे (वय २०, रा. जांबे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
हिंजवडीत अवजड वाहनांचा कहर; मृत्यूंची मालिका थांबेना
हिंजवडी आणि आसपासच्या भागात अवजड वाहनांच्या धडकांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंताजनकरीत्या वाढत आहे. स्थानिक नागरिकांकडून अनेकदा आक्रोश व्यक्त करण्यात आला असून अवजड वाहनांवर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे.
१० ऑक्टोबर : माण–हिंजवडी रस्त्यावर ‘स्ट्रीट्स ऑफ युरोप’ मॉलसमोर डंपरखाली तरुणी ठार.
सुमारे दीड-दोन महिने पूर्वी : पीएमपीएमएल बसखाली येऊन एक तरुणीचा मृत्यू.
२४ जानेवारी २०२५ : वडजाई नगर येथे बेदरकार डंपर दोन तरुणींवर कोसळून त्यांचा मृत्यू.
नेरे परिसर : तरुणाचा डंपरखाली येऊन मृत्यू.
तसेच आणखी काही अपघातात नागरिक अपंगत्वाला सामोरे गेले आहेत.
स्थानिकांच्या मते, मागील वर्षभरात ७-८ जणांचा मृत्यू अवजड वाहनांच्या बेफिकीर वाहतुकीमुळे झाला आहे.
नागरिकांची मागणी : “विकास हवा, पण लोकांच्या सुरक्षेच्या किंमतीवर नाही”
रोज वाढणारी रहदारी, संकुचित रस्ते आणि अवजड वाहनांचा बेदरकार वेग — या सर्वांचा परिणाम म्हणून निरपराध जीव गमावले जात आहेत.
स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि वारंवार अपघातांना सामोरे जाणारे आयटी कर्मचारी प्रशासनाकडे एकच मागणी करत आहेत—
“हिंजवडी–मारुंजी–जांबे परिसरात तातडीने वाहतूक शिस्त, वेगमर्यादा, अवजड वाहनांवर नियंत्रण आणि सुरक्षिततेची पावले उचलावीत.”

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















