उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; एंड माईल कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न
पुणे | प्रतिनिधी : दि. 14 मार्च 2026
पुणे शहरातील मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी आणि एंड माईल कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. कोथरूड येथील एसएनडीटी मेट्रो स्टेशन पुणे येथे “रिक्षामित्र शेअर आणि प्रीपेड रिक्षा प्रकल्प” सुरू करण्यात येत असून या प्रकल्पाचे उद्घाटन शनिवार, 14 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे.
या प्रकल्पाचे उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार असून त्यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजूषा नागपुरे तसेच श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वीही मेट्रो स्थानकांवर शेअर रिक्षा सेवा सुरू करण्याचे काही प्रयत्न झाले होते. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सध्या पुण्यातील कोणत्याही मेट्रो स्थानकावर नियमित स्वरूपात शेअर रिक्षा सेवा उपलब्ध नाही.
दरम्यान, “रिक्षामित्र” तर्फे पुणे रेल्वे स्थानक येथे मागील सुमारे दोन वर्षांपासून प्रीपेड रिक्षा प्रकल्प यशस्वीपणे चालू आहे. या प्रकल्पाला प्रवासी आणि रिक्षा चालकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्याच अनुभवाच्या आधारावर आता मेट्रो स्थानकांवरही शेअर रिक्षा सेवा सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
कोथरूड येथील एसएनडीटी मेट्रो स्टेशनवर सुरू होणारा “रिक्षामित्र शेअर रिक्षा प्रकल्प” हा या दिशेने एक महत्त्वपूर्ण प्रयोग ठरणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पुणे मेट्रो प्रवाशांसाठी असलेल्या एंड माईल कनेक्टिव्हिटीच्या समस्येचे मोठ्या प्रमाणात निराकरण होण्यास मदत होणार आहे.
या सेवेमुळे नागरिकांना आपली वैयक्तिक वाहने मेट्रो स्टेशनवर पार्क करून पुढील प्रवासासाठी वेगळा पर्याय शोधण्याची गरज भासणार नाही. मेट्रो स्थानकापासून आसपासच्या परिसरात परवडणारी आणि सुलभ शेअर रिक्षा तसेच प्रीपेड रिक्षा सेवा उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमाचे व्यवस्थापन व संचालन Kevolution Technology Private Limited या पुण्यातील स्टार्टअप कंपनीमार्फत “बघतोय रिक्षावाला” संघटनेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रिक्षा सेवा अधिक सुसंगत, सुरक्षित आणि प्रवाशांना सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी आणि शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू होणारा “रिक्षामित्र शेअर रिक्षा प्रकल्प” हा पुणेकर नागरिक, मेट्रो प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यासाठी फायदेशीर ठरेल अशी माहिती डॉ. केशव नाना क्षीरसागर अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार सभा / बघतोय रिक्षावाला यांनी दिली आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















