थेरगाव / विशेष प्रतिनिधी : दि. २१ नोव्हेंबर : पुणे महापालिकेने मिळकतकर थकबाकीदारांसाठी लागू केलेल्या ‘अभय योजने’च्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतही तत्काळ अशीच योजना सुरू करावी, अशी मागणी युवा नेते तानाजी बारणे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बारणे यांनी अलीकडेच आयुक्त हर्डीकर यांची भेट घेऊन मिळकतकर थकबाकी, त्यावरील दंड व वाढत्या वसुली समस्येबाबत सविस्तर चर्चा केली. पुणे महापालिकेच्या योजनेनुसार, १५ जानेवारीपर्यंत संपूर्ण थकबाकी भरल्यास थकबाकीवरील व्याजामध्ये तब्बल ७५ टक्के सूट मिळणार आहे. अशाच पद्धतीने पिंपरी-चिंचवडमध्येही योजना लागू झाल्यास हजारो थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळेल, असे बारणे यांनी स्पष्ट केले.

सध्या महानगरपालिकेकडून दरवर्षी थकबाकीदारांना नोटिसा पाठवल्या जातात. सलग काही वर्षे कर न भरल्यास संबंधित मालमत्तेची जप्ती व लिलाव करण्याची कारवाईही केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत थकीत कर आणि व्याजाची रक्कम प्रचंड वाढल्याने वसुलीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘अभय योजना’ राबवल्यास वसुली वाढण्यासोबतच नागरिकांना कर भरणे सुलभ होईल, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला.
शहरासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरेल आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कर वसुली वेगाने होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. ही योजना लवकरात लवकर लागू करण्याची विनंतीही त्यांनी आयुक्तांना केली.
या प्रसंगी आबासाहेब ढवळे, हनुमंत बारणे, विजय राऊत, अतुल घोगरे, आप्पा साबळे, योगेश बालघरे, राजू पवार यांसह नागरिक उपस्थित होते.


मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















