परिवहन विभागाविरोधात रिक्षा-कॅब चालक रस्त्यावर; निवडणुकीत मंत्र्यांना धडा शिकवण्याचा इशारा पुणे | प्रतिनिधी: दि. ७ जानेवारी राज्यभरातील रिक्षा व कॅब चालकांनी परिवहन विभागाच्या धोरणांविरोधात उघडपणे रणशिंग फुंकले असून, “ड्रायव्हर एकता दिखायेगा! इलेक्शन में सबक सिखायेगा!!” असा ठळक संदेश असलेले निषेधात्मक पोस्टर्स आपल्या रिक्षा व कॅब वाहनांवर लावून तीव्र आंदोलन सुरू केले आहे. हा निषेध केवळ एखाद्या शहरापुरता मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रभर चालकांमधील असंतोषाचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे.
परिवहन विभागाच्या चुकीच्या धोरणांमुळे, वाढता भ्रष्टाचार, चालकांच्या मूलभूत प्रश्नांकडे होणारे सातत्याने दुर्लक्ष यामुळे आज रिक्षा व कॅब चालकांचे जीवनमान पूर्णपणे अडचणीत आले आहे. पॅनिक बटन, VLTD सक्ती, परवाना नूतनीकरणातील अडथळे, अवाजवी दंडात्मक कारवाया, अंमलबजावणीतील दुजाभाव तसेच चालकांच्या सुरक्षिततेकडे केलेले दुर्लक्ष — या सर्व कारणांमुळे चालकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
त्याचबरोबर ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या कॅब अॅग्रीगेटर कंपन्यांच्या ॲप्लिकेशन्सवर चालकांना सरकारमान्य दर न मिळणे हा अत्यंत गंभीर प्रश्न ठरत आहे. दरनियमनातील मनमानी, प्रचंड कमिशन कपात, कोणतेही कारण न देता अकाउंट ब्लॉक करणे, तक्रार निवारणाचा पूर्ण अभाव आणि अन्यायकारक अटींमुळे चालकांची आर्थिक पिळवणूक सुरू असून, शासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप चालकांनी केला आहे.
रिक्षा व कॅब चालकांच्या उपजीविकेवर थेट परिणाम करणाऱ्या या ॲप्लिकेशन्ससाठी कॅब अॅग्रीगेटर धोरण तातडीने लागू करावे, कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करावे आणि गिग कामगारांना कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी ठाम मागणी चालक संघटनांकडून करण्यात येत आहे.
रिक्षा-कॅब चालकांचा सरकारला थेट इशारा – समस्या नाही सुटल्या तर मतदानातून उत्तर देणार या पार्श्वभूमीवर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये परिवहन मंत्र्यांना व त्यांच्या कामगारविरोधी धोरणांना राजकीय धडा शिकवण्याचा निर्धार संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा व कॅब चालकांनी केला आहे. हा लढा केवळ घोषणांपुरता न राहता, प्रत्यक्ष वाहनांवर पोस्टर्स लावून लोकशाही मार्गाने जनतेपर्यंत पोहोचवला जात आहे.

विशेषतः पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर रिक्षा व कॅबवर हे निषेधात्मक पोस्टर्स झळकत असून, ही चळवळ दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. चालक संघटना, असंघटित कामगार आणि गिग वर्कर्स एकत्र येत “मत हेच आमचे शस्त्र आहे” असा थेट इशारा शासनाला देत आहेत.

पोस्टर लावून बंडखोरी! रिक्षा-कॅब चालकांचा राज्यव्यापी निषेध, निवडणुकीत हिसाब चुकता करणार जर रिक्षा व कॅब चालकांच्या मूलभूत प्रश्नांकडे तातडीने गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशाराही भारतीय गिग कामगार मंच चे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्यातर्फे यावेळी देण्यात आला आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















