पुणे / प्रतिनिधी : दि. २० नोव्हेंबर : लोणावळ्यात वाढत चाललेल्या टॅक्सी माफियाच्या अत्याचाराविरोधात महाराष्ट्र कामगार सभेने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना निवेदन सादर केले. परिसरातील नागरिक, पर्यटक तसेच बाहेरील कॅब चालकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी सभेतर्फे करण्यात आली.
दरम्यान, या अन्यायाविरोधात शंकर लेंडवे हे कॅब चालक पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
काय आरोप करण्यात आले?
– लोणावळ्यातील टॅक्सी माफिया पर्यटकांकडून तिप्पट–चौपट भाडे वसूल करतात.
– महाराष्ट्रातील इतर भागांतून येणाऱ्या कॅब चालकांना मारहाण, धमक्या व खंडणी वसुलीचे प्रकार घडतात.
– मागील आठवड्यात IGF कॅब संघटनेचे सभासद तात्याराव पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून, अशा अनेक घटनांकडे स्थानिक पोलिसांकडून पुरेशी दखल घेतली जात नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
पर्यटनावर गंभीर परिणाम
महागडी व दहशतीच्या वातावरणातील टॅक्सी सेवा हा लोणावळा पर्यटनासाठी मोठा धोका ठरत असल्याचे सभेने अधोरेखित केले. “हॉटेल व जेवणाच्या खर्चापेक्षा टॅक्सीचा खर्च जास्त पडत असल्याने नागरिक लोणावळ्याला येणं टाळत आहेत,” अशी टीका यात करण्यात आली.
महाराष्ट्र कामगार सभेची भूमिका
सभेच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षकांसमोर तीव्र नाराजी व्यक्त करत, लवकरात लवकर टॅक्सी माफियाविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच,
“लोणावळा टॅक्सी माफियामुक्त करून नागरिक आणि राज्यातील गोरगरीब कष्टकरी कॅब चालकांना त्यांच्या हक्कांचे संरक्षण देण्याचा आम्ही निर्धार करतो,” असा इशारा संघटनेकडून देण्यात आला.
लोणावळ्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















