१० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष गौरव; ‘कॅमेरा डॉक्टर’ ठरले आकर्षण
पुणे | प्रतिनिधी : दि. 12 एप्रिल 2026
पुण्यातील फोटोग्राफी क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरलेला पुणे फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचा ‘फोटो फेअर’ आणि ‘विशेष गौरव सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. असोसिएशनच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाला पुणेकर फोटोग्राफर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या भव्य प्रदर्शनातून जागतिक दर्जाच्या आधुनिक फोटोग्राफी तंत्रज्ञानाची झलक एकाच छताखाली पाहायला मिळाली. मान्यवर कांजी भाई आणि सोनीचे अभिजीत यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
फेअरमध्ये निकॉन, कॅनन, लुमिक्स, फ्युजी, एचपी, डिजिटेक आणि गोडॉक्स यांसारख्या नामांकित ब्रँड्ससह एकूण १८ स्टॉल्स उभारण्यात आले होते. या प्रदर्शनाला पुण्यातील ६०० हून अधिक फोटोग्राफर्सनी भेट देत नवीन कॅमेरे, लेन्सेस आणि लाइटिंग उपकरणांची माहिती घेतली.
‘कॅमेरा डॉक्टरांचा’ विशेष सन्मान
कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे कॅमेरा रिपेअर तज्ज्ञांचा विशेष गौरव सोहळा ठरला.
“ज्याप्रमाणे डॉक्टर मानवी शरीराची काळजी घेतात, त्याचप्रमाणे कॅमेऱ्याला नवसंजीवनी देण्याचे काम रिपेअरिंग तज्ज्ञ करतात,” अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते शहरातील सात कॅमेरा रिपेअर तज्ज्ञांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती, स्पर्धा विजेत्यांचा गौरव
या सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध इंडस्ट्रियल फोटोग्राफर विश्वास सोरटे उपस्थित होते. तसेच, असोसिएशनतर्फे आयोजित विविध फोटोग्राफी स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
दहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा टप्पा गाठल्याबद्दल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सदस्य, सहभागी आणि सहकाऱ्यांचे आभार मानत पुढील काळातही अशाच उपक्रमांची ग्वाही दिली.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















