हरीश शर्मा | पुणे पीसीएमसी न्यूज नेटवर्क – दि. 25 मार्च 2026
पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रवेशावर मर्यादा आणण्याचा निर्णय महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतल्याची माहिती समोर येताच शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच बंधने आणण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका जोर धरत आहे.
महापालिकेच्या सभागृहात शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. नागरिकांच्या पैशातून चालणाऱ्या या व्यवस्थेचे कामकाज पारदर्शक राहावे, यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, कॅमेरे आणि डिजिटल कव्हरेजवर निर्बंध घालण्याच्या निर्णयामुळे ‘नेमकं काय लपवलं जातंय?’ असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
निवडणुकांच्या वेळी सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करणारेच लोकप्रतिनिधी आता सभागृहातील घडामोडी जनतेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सभागृहातील वाद, गोंधळ किंवा कामकाजातील त्रुटी बाहेर येऊ नयेत, यासाठीच हा निर्णय घेतला गेला का, असा संतप्त प्रश्न पत्रकार आणि नागरिक विचारत आहेत. या निर्णयामुळे पत्रकार संघटनांमध्ये नाराजी पसरली असून, माहितीच्या मुक्त प्रवाहावर मर्यादा आणण्याचा हा प्रकार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, या निर्णयावर प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण अपेक्षित असून, पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आता पुढील भूमिका काय घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














