पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
बोर्ड प्रशासनाविरोधात जनआक्रोश – पहिल्या च दिवशी गडांकुश यांचे आरोग्य बिघडले: खडकीतून विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे
खडकी / प्रतिनिधी : दि.१४ ऑक्टोबर
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील विविध गैरप्रकारांविरोधात सामाजिक कार्यकर्ता अभिजित गडांकुश यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाला खडकी परिसरातील नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
गडांकुश यांनी आपल्या मागण्यांमध्ये बोर्डाच्या हद्दीतील बेकायदेशीर मोबाइल टॉवरची चौकशी करून ते तत्काळ काढून टाकावेत, तसेच बोर्डाच्या शाळांमध्ये संविधान शिक्षण अनिवार्यपणे शिकवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील प्रसूतीगृहात होत असलेल्या अनियमितता, रुग्णांना घाबरवून बाहेर पाठविणे, तसेच गरज नसताना सीझर पद्धतीने डिलिव्हरी केल्या जात असल्याच्या तक्रारींची चौकशी व्हावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
याशिवाय बोर्डातील व्यावसायिक गाळ्यांचे वाटप पारदर्शक लिलाव पद्धतीने करण्यात यावे, अशीही गडांकुश यांची प्रमुख मागणी आहे.
उपोषणाच्या पहिल्या दिवशी बोर्डाचे निवासी डॉक्टर डॉ. रणजित भोसले यांनी अभिजित गडांकुश यांची आरोग्य तपासणी केली असता त्यांचा रक्तदाब वाढलेला आढळला. तरीदेखील त्यांनी आपले उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
गडांकुश यांच्या उपोषणाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून मोठा पाठिंबा मिळत आहे. यामध्ये दलित पँथर चे यशवंत नडघम, विशाल ( साकी ) गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राहुल अवचिते, आरटीआय कार्यकर्ता बबलू पोलकम, दलित पँथरचे विशाल ओव्हाळ, विशाल केदारी, लहुजी शक्ती सेनेचे विशाल पवार, आरपीआयचे प्रवीण गायकवाड, काँग्रेस खडकी ब्लॉक अध्यक्ष भरत ठाकूर, आरटीआय कार्यकर्ता ललित ससाणे, सामाजिक कार्यकर्ते विजय शेलार तसेच मुस्लिम समाजातील काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
तथापि, खडकी कॅन्टोन्मेंटच्या एकाही माजी सदस्याने अद्याप उपोषणस्थळी भेट दिलेली नाही. मात्र माजी सदस्या संगीता गवळी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन अभिजित गडांकुश यांची विचारपूस केली.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “बोर्ड प्रशासनाने मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तात्काळ चौकशी सुरू करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल,” असे सांगण्यात आले.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏




















